Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्याचे भाजपाचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने सन २०२१-२२
च्या गळीत हंगामातील गाळप ऊसाची थकीत एफआरपी २० कोटी ५४ लाख ५० हजार रुपये मुदतीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न दिल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कारखान्याने उत्पादित केलेली साखर,
मोलॅसीस व बगॅस ताब्यात घेत त्याची विक्री करून १५ टक्के व्याजासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
तालुक्यातील भाजपचे आमदार पाचपुते यांच्या मालकीचा खाजगी हिरडगाव येथे साईकृपा साखर कारखाना असून आर्थिक अडचण व शेतकऱ्यांचे गाळपाचे बिले न देता आल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे.
मात्र केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी भागीदारी करत ऊर्जितावस्थेत आणल्याची चर्चा आहे. गडकरी यांच्या नावावर विश्वास ठेवून तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामात कारखान्याला ऊस दिला.
परंतु कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक करत एफआर पी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यामुळे काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागील अनुभव लक्षात घेता साखर आयुक्त यांच्याकडे याबाबत तक्रार केली.
या बाबत कायदेशीर सुनावणी होऊन या कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसीस व मळी ताब्यात घेत त्याची विक्री करण्याचे अधिकार देऊन शेतकऱ्यांचे थकीत देणे व्याजासह देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.