Ahmednagar News : गेल्या काही दिवसांमध्ये विवाहित महिलांवरील वाढत्या घरगुती हिंसाचारांच्या अनेक घटनांची नोंद राज्यात झाली आहे. यात पती हाच पत्नीवर अनेकदा होणाऱ्या हिंसाचारास जबाबदार असतो. लग्नापूर्वी मी तू सांगशील ते करील,मी अमुक तमूक करीन अशी शपथ घेणारे अनेकजण लग्नानंतर मात्र नेमके याच्या विरुद्ध कृती करतात.
अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती काय करेल सांगता येत नाही. सध्या महिलांच्या चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या गैरसमजांमुळे मोठमोठे गुन्हे देखील झाले आहेत.
नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या पतीने पत्नीवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील असाच प्रकार घडला आहे. यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पतीने पत्नीला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने वार करून जखमी केल्याची घटना दि. १४ जुलै रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली आहे.
पत्नी घरात असताना आरोपी पती दारू पिऊन घरी आला व पत्नीवर संशय घेऊन शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पत्नीवर चाकूने वार करून मुलाला कुदळीच्या दांड्याने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर पत्नीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या अनेकदा महिलांवरील अत्याचार कमी झाले असल्याचे मोठे दावे केले जातात मात्र एकदा वर्षभरातील अशा घटनांवर प्रकाशझोत टाकल्यास हे सर्व दावे फोल ठरल्य्याचे दिसते.