अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान केले होते. या विधानावरून राजकारण पेटले असून, मोदींवर वादग्रस्त व्यक्तव करणाऱ्या पटोलेंवर भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
तर राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा निषेध केला गेला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिलेले नाही.
त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. यासंदर्भात विखे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे.
कोविड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्त्वपूर्ण आहे. सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टीका करायला संधी नाही. मोदी यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या काँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या विरोधात बोलण्याची धडपड देशात सुरू केली आहे.
परंतु जनाधारच कुठे मिळत नसल्याने असे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्यापलीकडे कोणतेही काम आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिले नसल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला. पटोले यांनी मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात राजकारण पेटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र काँग्रेस स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे नानांच्या उपचारांसाठी आम्हीच पुढाकार घेऊन त्यांना ईलाजासाठी 1 हजार 1 रुपयांची मनी ऑर्डर करणार आहोत, अशी खोचक टीका पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केलीय.
तसंच ‘नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न…. नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अत्यंत लांछनास्पद आहे. त्यांनी त्यांची योग्यता ओळखून बोलावे.
नाना पटोले यांना तज्ञांकडून मानसिक उपाचारांची गरज असून लवकरात लवकर त्यांनी मानसिक उपचार घ्यावेत’, असा सल्लाही मुळिक यांनी दिला आहे.