अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 ahmednagar accident :-चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर दरीत कोसळला. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात एका धोकादायक वळणावर दहा चाकी टँकरचा अपघात होऊन टँकर दरीत जाऊन कोसळून यात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हा अपघात शनिवारी पहाटे झाला असून यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. माणिकदौंडीकडून हा टँकर पाथर्डीच्या दिशेने जात असताना
घाटात धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून टँकर सुमारे चाळीस ते पन्नास फूट खोल दरीत जाऊन कोसळला. केळवंडी गावापासून घाट सुरु झाल्यांनतर तिसर्या वळणावर माणिकदौंडी गावाकडून येणारा हा टँकर ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूचा लोखंडी कठडा तोडून टँकर खाली जाऊन पडला.
नव्यानेच झालेल्या बारामती -अमरापूर हा राज्य मार्गने वाहतूक वाढली असून माणिकदौंडी घाटात अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत.
सातत्याने अपघाताची मालिका घाटात सुरूच आहे. या घाटातील धोकादायक वळणे काढून रस्त्याच्या बाजूचे हे स्वरंक्षण कठाडे सिमेंटचे असावेत अशी मागणी माजी पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.