वाळकीच्या सामाजिक कार्यकर्त्यामुळे मिळाला पक्ष्यांना हक्काचा निवारा !

Pragati
Published:
social work

सिमेंटच्या वाढत्या जंगलासोबत पशू, पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होत असल्याने व ग्रामीण भागातही वृक्षतोडचे प्रमाण वाढत असल्याने पर्यावरण मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पावसाळ्यात पक्ष्यांची घरटी उपलब्ध करुन देण्याची मोहिम हाती घेतली आहे.

उन्हाळ्यात पशु, पक्ष्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी भालसिंग यांनी विविध ठिकाणी झाडावर भांडी लटकवून धान्य व पाण्याची व्यवस्था केली होती. तर पावसाळ्यात त्यांनी पक्ष्यांसाठी नारळाच्या सालीपासून बनवलेले कृत्रिमरित्या बनवलेले व वॉटरप्रुफ असलेले हुबेहुब सुगरणीचे घरटे झाडावर पक्ष्यांसाठी टांगले.

वाळकी (ता. नगर) येथील शेत परिसरात असलेल्या झाडांना त्यांनी घरटी टांगून पक्ष्यांची सोय केली आहे. या परिसरात चिमण्यांसह इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार असून, बुलबुल, कबुतर, सनबर्ड, पोपट यांसारख्या पक्ष्यांचा मधुर आवाज कानी पडतो. वाढत्या शहरीकरणामुळे व वृक्षांच्या कत्तलीमुळे पशु-पक्ष्यांची घरे उध्वस्त होत आहेत. पण त्यांची काळजी घेता येते, हे भालसिंग यांनी आपल्या उपक्रमातून दाखवून दिले आहे.

सातत्याने घराच्या भोवती, शेता बांधावर, विविध धार्मिक स्थळी व ओसाड परिसरात वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम भालसिंग करत आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी पक्ष्यांना वाचविण्यासाठी उन्हाळ्यात विविध ठिकाणी धान्य व पाण्याची व्यवस्था केली होती.

मागील एक वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. त्यांनी ज्या ठिकाणी पक्ष्यांसाठी धान्य, पाण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी पक्ष्यांची संख्या वाढली असून, त्याच ठिकाणी घरट्यांची व्यवस्था केली जात आहे. पर्यावरणाची आवड असल्याने निसर्ग संवर्धनाबरोबरच पशु, पक्षीसंवर्धनाची जबाबदारी ते पेलवित आहे.

पक्ष्यांसाठी ध्यान्याची व पाण्याची व्यवस्था ते नियमितपणे करतात. पक्ष्यांना हक्काचा निवारा देण्याचे काम भालसिंग करत आहे. उन्हाळ्यात पशु, पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय केल्यानंतर पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. पावसाळ्यात वारा आणि जोरदार पावसाने त्यांची घरटी टिकत नसून, त्यांच्यासाठी कृत्रिमरित्या बनवलेल्या हुबेहुब सुगरणीच्या घरट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपण ठरवले तर पक्ष्यांना छोटासा निवारा व अन्न, पाण्याची व्यवस्था करु शकतो. यामुळे पक्ष्यांची कमी होणारी संख्या वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाची शहरासह ग्रामीण भागातही गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe