Ahmednagar News : सध्या आपल्या वागणुकीमुळे प्रचंड चर्चेत असलेल्या पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले असून त्यांचे देखील अनेक कारनामे समोर येत आहेत.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत. तर दिलीप खेडकर यांच्या पत्नी म्हणजेच डॉ.मनोरमा खेडकर या गावच्या सरपंच आहेत.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे, दिलीप खेडकर यांनी मेकॅनिकलमध्ये पदवी घेतली आहे. दरम्यान खेडकर सेवानिवृत्त झाले आहेत. नुकत्याच झालेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक देखील लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता.
यात विशेष म्हणजे त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झालेले आहे. तर याच मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत निलेश लंके २८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर दिलीप खेडकर यांना या निवडणुकीत अवघी १३ हजार ७४९ एवढी मते मिळाली आहेत. या मतदारसंघातील उमेदवारांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर राहिले होते.
लोकसभा निवडणुकी दरम्यान भालगावात भाजप उमेदवार सुजय विखे यांना काही नागरिकांनी विरोध केला होता. तसेच त्यानंतर माणिक खेडकर यांचे तालुकाध्यकपद काढून घेतल्याच्या चर्चा होत्या. या प्रकारामुळे विखे आणि खेडकर यांच्यात मतभेद झाले होते यातूनच दिलीप खेडकर यांनी वंचितकडून लोकसभा निवडणुक लढवली होती अशी देखील चर्चा केल्या जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांची एकूण संपत्ती ४०.५० कोटी असल्याचे दाखवले असून पुणे, अहमदनगर आणि नवी मुंबईतही त्यांचे फ्लॅट असल्याचे नमूद केले आहे.
खेडकर दाम्पत्यास दोन अपत्य असून पियुष व पूजा खेडकर अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी मुलगा पियुष खेडकर सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. दिलीप खेडकर यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर जमीन असून ते जवळपास ६० एकर वनविभागाची जमीन कसत आहेत. मात्र, वनविभागाची जमीनदेखील गैरपद्धतीनेच ते कसत असल्याच्या या भागात चर्चा आहे.
दरम्यान दिलीप खेडकर यांचे बंधू माणिक खेडकर हे भाजपचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून दिलीप खेडकर यांनी मोहटादेवीला ‘जर उमेदवारी मिळाली तर देवीला दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करू’ असे साकडे घातले होते.