अहमदनगर बातम्या

शुकशुकाटचा चोरटे घेतायत फायदा; जामखेड तालुक्यात दिवसा होतायत घरफोड्या

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  गावातील शुकशुकाटाचा गैरफायदा उठवत जामखेड तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकाच दिवशी अनेक घरे फोडण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी प्रयत्न करूनही चोरटे त्यांच्या हाती येत नव्हते.

अखेर शनिवारी तालुक्यातील वाघा गावात ग्रामस्थांनी या चोरट्यांना पकडलं आहे. विशेष म्हणजे हेच चोरटे आधी एका गावात चोऱ्या करून वाघा गावात आले होते.

तेथे चोरीचा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर केला. काही वेळात गावातील आणि शेतावर गेलेले ग्रामस्थही एकत्र जमले आणि तिघा चोरट्यांना गावातच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

आदित्य उर्फ सोंड्या गणेश पिंपळे (वय वर्ष २० रा.अशोकनगर, श्रीरामपूर) प्रदीप उर्फ चक्क्या चंद्रकांत काळे (वय २१) आणि बाबू फुलचंद काळे (वय २४, दोघेही रा, सदाफुले वस्ती, जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत.

त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा, वाघा या परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे गुन्हे वाढले आहेत.

यामुळे ग्रामस्थ आणि पोलीसही हैराण झाले आहेत. गावातील नागरिक कामावर गेले कि, चोरटे चोऱ्या करत असत. असाच चोरीचा काहीसा प्रकार अनेक ठिकाणी घडला.

गावकर्यांनी माहिती उपसरपंच शिवाजी बारस्कर यांना दिली. त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सर्व ग्रामस्थांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली.

त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र जमले. गावात शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी हे तिघे संशयित दुचाकीवरून जाताना आढळून आले. गावकऱ्यांनी त्यांना पकडले.

त्यांच्याबद्दल संशय आला. त्यामुळे त्यांना पकडून ठेवून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तिघा संशयितांकडे चौकशी केली, त्यांची झडती घेतली असता त्यांनी गुन्हे केल्याचे आढळून आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts