Ahmednagar News:शेतकऱ्यांचे पशुधन असणाऱ्या गाय- बैल जनावरांसाठी घातक असणारा लम्पी स्कीन या आजाराने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात घुसखोरी केली असून, अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे.
या आजाराने जनावरांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असून प्रसंगी वेळीच उपचार न केल्यास जनावर दगु शकतात. दरम्यान या आजाराने आता पाथर्डी तालुक्यात प्रवेश केला असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.
आल्हणवाडी व घाटशिरस येथे जनावरांना लम्पी आजार झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाथर्डी शहरातील जनावरांचा आठवडे बाजार तुर्तास बंद ठेवण्याचा आदेश पाथर्डीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी काढले आहेत.
याबाबत डॉ. पालवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापनाला लेखी आदेश दिले आहेत. पाथर्डी तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज रोगाचा पादुर्भाव वाढू नये म्हणून काळजी घ्यावी.
दक्षता जनजागृती व करावयाच्या उपाययोजना यावर नियंत्रणासाठी पाथर्डी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आपले गोठे स्वच्छ ठेऊन औषध फवारणी करत गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. आपल्या पशुधनाबाबत काही संशय आल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.