अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आज समोर आली आहेनिवडणूक आयोगाने राज्यातील 8 पैकी 6 विधान परिषद सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मात्र मतदारसंघातील कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 75 टक्के नसल्याने नगर व सोलापूर या दोन मतदारसंघातील निवडणूक स्थगित ठेवली आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यात या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय हालचालींना ब्रेक बसला आहे. नगर विधान परिषदेसाठी काही नेत्यांनी तयारी सुरू केली होती.
त्यांच्या तयारीवर आता पाणी पडणार आहे. विधान परिषदेसाठी मतदारसंघातील किमान 75 टक्के लोकल बॉडीज कार्यरत पाहिजे, असा नियम आहे.
मात्र जिल्ह्यातील अकोले, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव या 5 पालिका व भिंगार छावणी परिषदेवर सध्या प्रशासक आहेत. तर शिर्डी, पाथर्डी, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, देवळाली-प्रवरा या 8 पालिकांची मुदत डिसेंबर 2021 मध्ये संपत आहे.
नगर जिल्हा परिषद व नेवासा परिषदेची मुदत 2022 पर्यंत तर श्रीगोंदा व नगर महापालिकेची मुदत 2024 पर्यंत आहे. मात्र प्रशासक असलेल्या पालिका निवडणुकीसाठी ग्राह्य नसल्याने जिल्ह्यातील 18 पैकी 12 संस्था नियमानुसार कार्यरत आहेत. त्याची टक्केवारी 66.66 आहे.
75 टक्के कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमाची पूर्तता होत नसल्याने नगर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. नगर विधान परिषद निवडणूक आता जिल्ह्यातील पालिका निवडणुकीनंतरच होणार की आणखी लांबणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष आहे.