अहमदनगर बातम्या

Ahmednagar City News : नगर शहर मर्डर सिटी झाली ! ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Ahmednagar City News : पोलीस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे अहमदनगर शहर हे मर्डर सिटी झाले आहे. एकामागे एक राजरोसपणे शहरात खून, हत्याकांड होत आहेत. नुकताच केडगाव येथे एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली असून त्या आधीची ओंकार उर्फ गामा भागानगरे याच्या हत्याकांडाची घटना देखील अद्याप ताजी आहे. ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात असणाऱ्या चारही पोलीस स्टेशनचे कार्यक्षमपणे नेतृत्व करू शकणारा संदीप मिटकें सारखा सक्षम डीवायएसपी शहर विभागाला द्या, अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, अलतमश जरीवाला, अशोक शिंदे, सोफियान रंगरेज, हाफिज सय्यद, विकास भिंगारदिवे, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, राहुल चाबुकस्वार, गौरव घोरपडे, सिकंदर शिंदे, शेखर शिंदे, पवन शिंदे, अंकुश धनगर, गोरख शिंदे बाबाजी शिंदे, गोविंद शिंदे, गोरख धनगर, किरण शिंदे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाची प्रत शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांना देखील देण्यात आली आहे.

काळे म्हणाले, नगर शहर हद्दीतील तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन अंतर्गत असणारी कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासाळली आहे. बालिकाश्रम रोड वरील हत्याकांडानंतर सावेडी उपनगरामध्ये गर्दीच्या वेळी भर रस्त्यात नंग्या तलवारी नाचवत दहशत करण्यात आली. एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शहरात सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून बहुतांशी या घटना ह्या अवैध धंदे करणाऱ्यांशी संबंधित असल्याचे दिसत आहे.

अनेक ठिकाणी बेकायदेशीर ताबे पोलीस प्रशासनाच्या वरदहस्थातूनच मारले जात असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्या राजकीय वरदहस्तातून ज्यांचे राजकीय कार्यकर्ते व्यापारी, उद्योजक, सामान्य नगरकर यांच्या जमिनीवर ताबे मारीत आहेत तीच मंडळी ताबे बहाद्दरांवर कारवाई करण्याची मागणी करत समाजाची व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करताना दिसत आहेत. पोलिसांनी मात्र याबाबतीत सजगपणे राजकीय दबाव झूगारून अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे यावेळी काळे म्हणाले.

निवेदनात म्हटले आहे की, मंगळसूत्र चोरी, वाहन चोरी, घरफोड्या, मारामाऱ्या यांचे सत्र सुरूच आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटेनाशी झाली आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र भयभीत आहेत. संरक्षणास पोलीस कमी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अनेक वेळा अन्यायग्रस्त, तक्रारदार आपली प्राथमिक पुरावे घेऊन फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. मात्र टाळाटाळ केली जाते. विनाकारण एसपी कार्यालयाकडे अर्ज करण्याची सूचना केली जाते. राजकीय दबाव असणाऱ्यांच्या, गुन्हेगारांच्या फिर्यादी माञ घेतल्या जातात. कायदा सर्वांना समान आहे. असा भेदभाव पोलिसांनी करणे गैर असल्याचे काळेंनी म्हटले आहे.

शहराचा बदलौकिक पुसा, बैठका घ्या :
नगर शहराला मर्डर सिटीच्या मिळालेला बदलौकिक पुसण्यासाठी एसपींनी शहराचे डीवायएसपी व चारही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व अन्य संबंधित अधिकारी यांची विशेष बैठक तातडीने आयोजित करून याबाबत कठोर उपाय योजना करण्याबाबतच्या सूचना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

तडीपारांच्या यादीतून नेमके “तेच” गुन्हेगार का सुटतात ? :
पोलीस तडीपार, मोक्का, एमपीडीए अंतर्गत कारवाई करतात. मात्र असे असून देखील शहरात सुरू असणाऱ्या हत्या, खुनी हल्ले यासारख्या गंभीर कृत्यांमध्ये गुन्हेगारीची मोठी पार्श्वभूमी असणाऱ्यांचाच मोठा सहभाग आहे. कारण तडीपारी व अन्य संबंधित कारवायांमधून अशा प्रकारचे गुन्हेगार हे सुटत आहेत. असे का होत आहे, याची चौकशी झाली पाहिजे. अशांना शहर व जिल्ह्याबाहेर तडीपार केले पाहिजे, अशी मागणी यावेळी काळेंनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts