अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, मात्र या लसीकरण मोहिमेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिक यापासून वंचित राहू लागले आहे.
याच अनुषंगाने मनपाच्या आयुक्तांनी महत्वपूर्ण सूचना केल्या आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर होणारा नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबविण्याच्या सूचना देत, कुणाच्या दबावाखाली काम करू नका, असा स्पष्ट आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नगरसेवकांचा हस्तक्षेप वाढला आहे. ज्येष्ठांना डावलून सावेडी आरोग्य केंद्रात युवकांना लस देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त गोरे यांनी सातही लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत कर्मचाऱ्यांनी लसीकरणाच्या वेळी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्त गोरे म्हणाले, शासनाच्या नियमानुसारच लसीकरण करा, कुणाच्याही दबावाखाली येऊ नका.
नियम डावलून लसीकरण झाल्यास हिशोब देताना अनेक अडचणी येतील. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता काम करा, असा आदेश गोरे यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.