अहमदनगर बातम्या

पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा ‘मुळा’चे दरवाजे उघडले; इतक्या हजार क्युसेकने विसर्ग सुरु

Ahmednagar News : शुक्रवारी सायंकाळी राहुरीत सुरू झालेला धुव्वाधार पाऊस शनिवारी मध्यरात्री थांबला. दरम्यान, शनिवारी दुपारनंतर पुन्हा पावसाच्या आगमनाने जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवार सायंकाळ ते मध्यरात्री पर्यंतच्या पावसाची गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत विक्रमी नोंद झाली.

मुळानगर १२८ मिलिमीटर, राहुरी १०० मिलिमीटर, कोतूळ २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धुव्वाधार पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी व सोयाबीन पिकात पाणी साचल्याने पिके सडू नये म्हणून पाणी शेतातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली.

शनिवारी सकाळी ९ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा २४ हजार ८१७ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ९५.४५ टक्के भरले. सकाळी ९ वाजता कोतूळकडुन मुळा धरणात १५१३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

जलाशय परिचालन तक्त्यानुसार १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २४ हजार ८८४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याने शनिवारी रात्री नऊ वाजता मुळा धरणातून मुळा नदीपात्रीत १० हजार क्युसेकने, तर दुपारी १२ वाजता २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

गेल्या पंधरवाड्यात धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याची ही दुसरी वेळ आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रात टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. दरम्यान धरणातून नदीपात्रात २ हजार क्युसेकने पाणी सोडताना धरणाच्या ११ मोऱ्या प्रत्येकी ३ इंच वर उचलण्यात आल्या होत्या.

मागील आठवड्यात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिकांसाठी शेती पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. शनिवारपर्यंत मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात ४०८.९६ दशलक्ष घनफूट, तर मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात १३५.१० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts