Ahmednagar News : आधी लोकसभेच्या आचारसंहितेमुळे व आता गॅस पाइपलाइनच्या कामामुळे शहरात मंजूर असलेल्या अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत. परिणामी नागरिकांचा सध्या खड्ड्यातून प्रवास सुरु आहे.
हे रस्ते झाल्यास चांगले रस्ते मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र आता शहरातील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नगरकरांना चांगल्या रस्त्यांसाठी आणखी काही महिने प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
आचारसंहितेमुळे निवणुकीपूर्वी शहरात मंजूर झालेली सुमारे २८० कोटींची कामे ठप्प आहेत. आचारसंहिता शिथिल झाल्याने निविदा मंजूर करून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची तयारी राजकीय नेत्यांकडून सुरू आहे.
मात्र, बहुतांश प्रस्तावित रस्त्यांच्या जागी काम सुरू करण्यापूर्वी गॅस पाइपलाइनचे काम करावे लागणार आहे.त्यामुळे मनपा प्रशासनाने भारत गॅस रिसोर्सेसला पूर्वीच्या प्रस्तावानुसार प्रस्तावित असलेल्या ठिकाणी रस्त्यावर खोदाईसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, मनपा प्रशासनाने शासन आदेशानुसार नव्याने खोदाई शुल्क निश्चित केले आहे. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चार प्रभागातील खोदाई रखडली आहे.
नगर शहरात सुमारे पावणेतीनशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र या कामांच्या ठिकाणी आधी गॅस पाइपलाइन टाकण्याचे नियोजन मनपाकडून सुरू आहे. त्यामुळे शहरातील चार प्रभागांसह कामे प्रस्तावित असलेल्या १३६ किमी रस्त्यांच्या खोदाईसाठी मनपाने नव्याने प्रस्ताव मागवला आहे.
त्यात रस्ता खोदाई शुल्काचा तिढाही कायम आहे. परिणामी, तर रस्ते केले तरी देखील त्या भागात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी परत रस्ते खोदावे लागतील मात्र असे करणे परवडणारे नसल्याने हे काम ठप्प आहे .
त्यामुळे खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नगरकरांना चांगल्या रस्त्यांसाठी आणखी काही महिने प्रतिक्षाच करावी लागणार आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ६, ७, ८ व ९ मध्ये ८१.६२ किमी खोदाई प्रस्तावित आहे.
तर मनपा निधीतील मंजूर रस्त्यांच्या ठिकाणी ९ किमी, राज्यस्तरीय नगरोत्थान रस्त्यांच्या ठिकाणी १९ किमी, मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत रस्ते होणाऱ्या ठिकाणी १८ किमी, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून प्रस्तावित रस्त्यांच्या ठिकाणी ९ किमी अशी ५५ किमीची खोदाई करावी लागणार आहे.
महापालिकेने गॅस कंपनीला सुरुवातीला २ हजार रुपये प्रति रनिंग मीटर या दराने शुल्क आकारले होते. त्यानंतर स्थायी समितीने दर वाढवले व त्यानुसार सुमारे वर्षभरापूर्वी कंपनीला नव्याने प्रस्ताव दिला.
त्यानंतर शासन निर्देशानुसार खोदाई शुल्क प्रस्तावित केले. मात्र, कंपनीकडून या वाढीव दराला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शहरात गॅस पाईपलाईनचे काम सध्या ठप्पच आहे.