Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील अनेक कामांसाठी शासन निधी देत नसल्यामुळे विकासकामे कोळंबली असून, याकडे आ. रोहित पवार यांनी लक्ष वेधत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे.
आ. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेज वर दोन फोटो शेअर करत म्हटले आहे की, कर्जत आणि जामखेड, या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचे कामे निधीअभावी ठप्प आहेत.
अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत. मात्र, या रुग्णालयांसाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असल्याचा आरोप करत आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा हा प्रकार असून, तो योग्य वाटत नाही.
उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का? राज्यातील शिंदे सरकारमध्ये अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. महाविकास आघाडीच्या काळात कर्जत व जामखेड येथील रुग्णालयांच्या वाढीव इमारतीसाठी आ. रोहित पवार यांनी निधी मंजूर करून घेतला होता.
मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व कर्जत जामखेडमधील कामांना मिळणाऱ्या निधीची आडवा आडवी सुरू झाली असून, यानिमित्ताने आ. रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘एक्स’ (ट्वीटर) अकाउंटवरही आ. रोहित पवार यांनी वरीलप्रमाणे पोस्ट करतानाच “दुसरं म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. ‘
राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात काम करतो. पण, ते विचारांचं आणि तत्त्वांचं असावं. राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय !
हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतकं काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का ? असा प्रश्न आ. रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.