ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणाने पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन होऊ शकत नाही. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून गावातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पिंपरी निर्मळ गावात मागील दोन दिवसांपासून घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री विखे पाटील यांनी नागपूरहून येऊन गावातील सर्व ग्रामस्थ, अधिकारी आणि हल्ला झालेल्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्थ, तरूण कार्यकर्ते, महिला यांच्याकडून झालेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. गावातील काही कुटुंबियांकडून होत अससलेल्या त्रासाची माहिती सर्वांनी मंत्रांना सांगून जाणीवपुर्वक घटनेत सहभाग नसलेल्या व्यक्तींवर गुन्हे नोंदविण्यात आले असून खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी सर्वांनी केली.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पिंपरी निर्मळ गावात जातीय संघर्ष कधी झाला झाला नाही; परंतु झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याचे समर्थन होऊ शकत नाही. घटना घडली त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक या सर्व घटनेची निपक्षपणाने चौकशी करतील, असे मंत्री विखे पाटील यांनी जाहीर केले.
ग्रामस्थांनीसुद्धा या घटनेबाबत काही माहिती चौकशी अधिकाऱ्यांना द्यायची असेल तर द्यावी, असे सूचित तेढ निर्माण होईल, असा प्रयन्न होऊ देऊ नका, सामाजिक माध्यमातून काही मेसेज फिरत असतील तर गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळीच थांबवावेत, पोलीस प्रशासनानेसुद्धा वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
गावातील दोन कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली. त्यांचे म्हणणे जाणून घेतले व जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधिक्षक संदीप मिटके यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत मंत्री विखे पाटील यांनी चर्चा केली.