Ahmednagar News : राहुरी शहरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीकांचे आरोग्य व शहराच्या स्वच्छतेकडे पालिकेने विशेष लक्ष देऊन तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय राबवावे, अशी मागणी राहुरी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे यांनी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत पत्रकात सोनवणे यांनी सांगितले, की राहुरी नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे सध्या राहुरी शहरातील नागरीकांना डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, गोचीडताप तसेच प्लेटलेटसारख्या आजारांना सामोरे जावे लागत असून रूग्णांमध्ये विशेषतः लहान मुले व वयोवृध्दांची संख्या जास्त आहे.
शहरात विविध प्रभागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. गटारी साफ केल्या जात नाही, त्यामुळे रस्त्यावर घाण साचून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील नागरीकांना विविध आजारांशी सामना करावा लागत आहे. शहरातील छोटे मोठे रूग्णालये रूग्णांची भरगच्च भरलेले आहे. त्यात ग्रामीण रूग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे.
पालिकेचे शहरातील आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने औषधांची फवारणी केली गेली नाही. वेळोवेळी पालिकेकडे मागणी करूनही मुख्याधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून नागरीकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला.
सध्या पालिकेवर प्रशासक राज्य असल्याने अधिकारी मनमानी पद्धतीने वागत आहेत. शहरातील पाणी, वीज, आरोग्य या नागरी सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असून अधिकाऱ्यांना मात्र याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
पालिकेने जनतेच्या आरोग्याशी न खेळता ताबडतोब शहरात सर्व प्रभागात डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी तसेच शहरातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अन्यथा पालिकेवर मोर्चा आणावा लागेल असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.