अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार ! अटक होणार कधी ?

Ahmednagar News : येथील दुधगंगा नागरी पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब दामोधर कुटे याच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी,

ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, आदी मागण्यांसाठी दुधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने काल शनिवारपासून संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश व उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले.

दुधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपी अटकेत असून काही जणांना जामीन मंजूर झाला आहे.

यातील मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गुन्हा दाखल होऊन तब्बल दोन महिन्याचा कालावधी उलटत आला असतानाही मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक न झाल्याने ठेवीदारांमधून संताप व्यक्त होत आहे.

मुख्य सूत्रधारासह इतर आरोपींना अटक करावी, ठेवीदारांचे पैसे मिळावे, कर्जदार व जामीनदारांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी दुधगंगा नागरी पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीने शनिवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन व उपोषण सुरू केले.

या आंदोलनामध्ये ठेवीदार संघर्ष समितीचे मोहन लांडगे, प्रकाश गुंजाळ, कैलास देशमुख, प्रभाकर रहाणे, उमेश जगताप, हेमंत पवार, अनिल जोंधळे, बेबीताई थोरात, बाळकृष्ण करपे, पोपट आगलावे यांच्यासह ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी मोहन लांडगे यांनी दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts