अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar bajarpeth :-आज बाजारपेठेतील चिघळलेली परिस्थिती ही काही लोकांच्या डबल ढोलकी भूमिकेमुळे आहे. त्यामुळे बाजारपेठ उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
काँग्रेस शतप्रतिशत व्यापारी बांधवांच्या समवेत आहे. व्यापाऱ्यांना आमचा पाठिंबा आहेत. परंतु व्यापारी बांधवांना उध्वस्त करणारे घाणेरडे राजकारणी यांचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो, असे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.
व्यापारी महासंघ आणि विविध संघटनांच्या वतीने बाजारपेठेतील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविण्याच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला आज काळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह भेट देत पाठिंबा जाहीर केला. यावेळी काळे यांनी राजकारण्यांनी बाजारपेठेची वाट लावली असे म्हणत “त्यांचे” नाव न घेता जोरदार टीका केली.
यावेळी काळे यांनी अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर करत काही लोकांचा बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला.
शहराचे आमदार दहा मिनिटांसाठी आले आणि लगेच निघून गेले यावर देखिल काळे यांनी टीका केली. काळे म्हणाले की, सकाळी एकी बरोबर लग्न करायचं, जागरण गोंधळ दुसरीच घालायचं आणि लग्नानंतर तिसरीलाच फिरायला घेऊन जायचं, हा धंदा आम्हाला जमत नाही.
दुटप्पी भूमिका घेणारे हे व्यापाऱ्यांच्या आणि पथविक्रेते यांच्या पुरते लक्षात आले आहेत. ज्यांना राजकीय पोळी भाजायाची असेल त्यांनी ती जरूर भाजावी.
मात्र आपली पोळी भाजून घेत असताना व्यापारी बांधवांना उद्ध्वस्त करायच पाप जर कोणी करत असेल तर काँग्रेस ते कदापि होऊ देणार नाही.
काळे पुढे म्हणाले की, आज महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता नाही. काँग्रेसचा महापौर असता तर आज व्यापाऱ्यांवर असा प्रसंग आम्ही येऊ दिला नसता.
मात्र “ज्यांच्या” एकहाती नेतृत्वाखाली महापालिकेत सत्ता आहे, ज्यांच्या हुकुमाशिवाय महापालिकेत पान हलत नाही, त्यांनी आपला हुकूम जारी करून व्यापाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे होता.
मात्र व्यापारी बांधवांवर त्यांनीच अन्याय केला असून आज व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हा व्यापाऱ्यांसाठी काळा दिवस आहे.
कर गोळा करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे कटोरा घेऊन जाणारी मनपा आज व्यापाऱ्यांना त्यांच्या रोजीरोटीसाठी तथाकथित राजकारण्यांच्या अंधारात दिलेल्या आदेशावरून वेठीस धरत आहे.
काँग्रेसचा व्यापाऱ्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे. मनपा प्रशासनाने राजकारण्यांच्या दावणीला बांधलेली आपली खुट्टी मोकळी करत बाजारपेठेतील चिघळलेला प्रश्न तात्काळ सोडवावा.
अन्यथा काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा यावेळी काळे यांनी बोलताना दिला. व्यापारी यांना उद्ध्वस्त न करता योग्य तो मार्ग काढत न्याय देण्याच्या मागणीबाबत मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याचे काळे यांनी यावेळी जाहीर केले.
दरम्यान व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, सागर पेटकर व व्यापारी बांधवांनी काळे यांची काँग्रेस कमिटीत जाऊन समक्ष भेट घेत व्यापार्यांच्या प्रश्नावर चर्चा केली होती.
त्यानंतर काळे यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून व्यापारी बांधवांचा प्रश्न मार्गी लावण्याचा महानगरपालिकेला इशारा दिला आहे.
यावेळी काळे यांनी आजच्या या चिघळलेल्या परिस्थितीला शहराच्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरत त्यांचा नामोल्लेख न करता केलेल्या सडकून टीकेमुळे बाजारपेठेच्या प्रश्नावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.