Ahmednagar News : राज्यामध्ये अंगणवाडी मार्फत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांसह गर्भवती महिलांसाठी शासनामार्फत पोषण आहार दिला जातो.परंतु सध्या या पोषण आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान यापूर्वी हा पोषण आहार देणाऱ्या कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीला आता हा ठेका दिला आहे. त्यामुळे आहाराचा ठेका बदलताच लाभार्थ्यांकडून आहार निकृष्ठ असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
राहुरी तालुक्यात अनेक गावांमध्ये लाभार्थ्यांकडून पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढल्याची कबुली बालविकास अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली असून त्याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्याचे सांगितले आहे.
तालुक्यातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना दैनंदिन पोषण आहार दिला जातो. तसेच तालुक्यातील गरोदर, स्तनदा मातांची संख्या ३ हजार २६७ इतकी असून त्यांनाही अंगणवाड्यांमार्फत पोषण आहार दिला जातो.
३७० अंगणवाड्यांच्या माध्यमातून सेविका ३५४ इतक्या तर मदतनीस ३१७ इतक्या आहेत. राहुरी तालुक्यामध्ये या सेविका मदतणीस यांच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा केला जातो. पूर्वी राज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट को-ऑप कंझुमर्स फेडरेशन लि. मुंबई यांच्याकडून अंगणवाड्यांना पोषण आहार दिला जात होता.
त्यामध्ये गहू २ किलो, चना १.५ किलो, मुगदाळ १ किलो, साखर १ किलो, हळद पावडर २०० ग्राम, मिठ ४०० ग्राम, मिर्ची ५० ग्राम असे साहित्य दिले जात होते. शासनाकडून प्राप्त पोषण आहराचे साहित्य घेऊन माता आपल्या बाल्यांना अन्न शिजवून देत होते. परंतू नुकतेच राज्य शासनाकडून पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये बदल केल्याचे समजले आहे.
जस्ट युनिव्हर्स प्रा. लि. या कपंनीला पोषण आहार पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला आहे. दरम्यान, नविन पोषण आहार आल्यापासून अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना चांगलाच मनस्ताप झाल्याचे दिसत आहे. अपुरा शिजविलेला कच्चा माल बालक व मातांसाठी दिला जात आहे. सदरचा कच्च्या प्रमाणात शिजविलेली तूर, मूग ही घरी शिजविण्यास दिला जात आहे.
परंतू या साहित्यामध्ये तेल टाकून दिले जात असल्याने त्याची दुर्गंधी अधिक असल्याच्या तक्रारी अंगणवाडी सेविकांना मिळत आहे. याबाबत अंगणवाडी सेविकांकडून वरिष्ठांना तसा अहवालही देण्यात आला आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील आदिवासी अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांनी पोषण आहार आणून टाकत नित्कृष्ठपणा दाखवून दिला.
शासनाकडून जसा आहार आला तर लाभार्थ्यांना देतो, परंतू लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्याचे त्यांनी सांगितले. असा नित्कृष्ठ आहार बालकांना व स्तनदा मातांना कसा द्यायचा? असा प्रश्न लाभार्थ्यांनी पदाधिकारी व अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना विचारला.