सध्या राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांना याचा दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी कापूस आणि सोयाबीन पिकाची काढणी सुरू झालेली असल्याने नुकसान देखील होण्याची दाट शक्यता आहे.
अगदी याच पद्धतीने नगर तालुक्यात देखील परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली व नगर तालुक्यातील चास तसेच नागापूर सारख्या मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
परंतु असे असले तरी देखील मात्र जेऊर आणि रुईछत्तीसी व केडगाव मंडलात मात्र अद्याप पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी आता परतीच्या पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या बाबत असलेल्या आशा मात्र पल्लवीत झालेले आहेत.
नगर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी
नगर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, चास, नागापूर मंडलात अतिवृष्टी झाली आहे तर जेऊर, रुईछत्तीसी तसेच केडगाव मंडलात पावसाचे प्रमाण कमी आहे. तालुक्यातील बहुतांशी तलाव, बंधारे, नाले ओव्हरफ्लो झाले असले तरी जेऊर परिसरातील तलाव पूर्णक्षमतेने भरलेले नाहीत. कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे नद्या, नाले, ओढे वाहते झाले असून रब्बीच्या पिकांबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.नगर तालुका पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
येथे मोठ्या प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगररांगा विखुरलेल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जास्त अपेक्षा परतीच्या पावसाकडे असतात. गर्भगिरीच्या डोंगर रांगांमुळे परतीचे वारे अडवले जाऊन तालुक्यात शेतकऱ्यांना दिलासादायक पावसाने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. चास, नागापूर मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
वाळकी तसेच परिसरातील गावांसाठी वरदान ठरणारा धोंडेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. चिचोंडी पाटील येथील मेहकरी नदी वाहत असून, केळ तलावदेखील भरलेला आहे. नगर शहरात सीना नदीला पूर आला होता. अकोळनेर, चास, वाळकी, चिचोंडी पाटील, सावेडी, नेप्ती, कापूरवाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील बंधारे तुडुंब भरले असून तलाव, शेटे वस्ती तलावांना पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
परिसरातील सीना तसेच खारोळी नदी वाहत्या झाल्या असल्या तरी पिंपळगाव माळवी तलाव भरण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंपळगाव तलावात पाण्याची आवक सुरू असली तरी पाणीपातळीत जास्त वाढ झालेली नाही.परतीच्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावल्याने गहू, हरभरा, गावरान कांदा व रब्बी हंगामातील चारा पिकांबाबत शेतकऱ्यांचा आशा पल्लवी झालेल्या आहेत.
जेऊर येथील सीना, खारोळी नदी तसेच सोनेवाडी मोढवा नदी, रुईछत्तीसी येथील शुढळा नदी, सारोळा कासार परिसरातील पूर्वा नदी व चिचोंडी पाटील येथील मेहेकरी नदी, शेंडी येथील सीना नदी ओसंडून वाहत असुन नद्यांवरील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. जेऊर मंडलातील शेतकरी मात्र जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.