अहमदनगर बातम्या

संगमनेर तालुक्यातील रस्ता चार वर्षापासून प्रलंबित ! उपोषणाचा इशारा

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील शिदोंडी ते वरवंडी या घाट रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहे. सुरूवातीला केलेले सर्व खडीकरण उखडून हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालवताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था खड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. त्यात ठेकेदाराचा चालढकलपणा अनेक शंका निर्माण करणारा ठरतोय. हा रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास २५ मार्च रोजी रिपाइं आणि ग्रामस्थांच्या वतीने उपोषणाचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) संगमनेर तालुका मराठा आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम वर्षे यांनी नुकतेच संगमनेरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून या रस्त्याबाबत अडचणीचा पाढा शासन दरबारी मांडला आहे. वरवंडी ते शिंदोडी घाट रस्ता २५१५ या योजनेतून मंजूर आहे. मात्र हे काम केवळ ठेकेदाराच्या चालढकलपणामुळे प्रलंबित आहे.

सदर निवेदनात गौतम वर्षे यांनी म्हटले आहे की, २०२० मध्ये या रस्त्याचे काम ठेकेदाराने चालू केले व खडी टाकून कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली. परंतु मागील १३ ते १४ महिन्यांपासून हे काम पूर्णपणे बंद आहे. या रस्त्याचे काम त्वरित चालू करावे. तसेच आज रस्त्याची झालेली दुरावस्था अतिशय चिंताजनक आहे. जे काम आधी केले होते. ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे होते.

आता तर पूर्ण पूर्ण खडी ठिकठिकाणी गोळा झालेली असून रस्त्यात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. सदर ठेकेदाराला दोषी ठरवून त्याच्यावर देखील कारवाई करावी. अन्यथा २५ मार्च रोजी वरवंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा गौतम वर्षे यांनी दिला आहे.

सदर निवेदनावर संगमनेर पठारभागाचे विभाग प्रमुख सागर शिंदे, संगमनेर युवा विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भोसले, वरवंडी शाखेचे शाखाध्यक्ष भरत भोसले, प्रदीप भोसले, शिंदोडीचे सामाजिक कार्यकर्ते रबाजी कुदनर यांच्या सह्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts