अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना अनेक वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन याचा सातत्याने तुटवडा देखील रुग्नांना भासतो आहे.मात्र शहरात रुग्णांची बेडसाठी होणार धावाधाव रोखण्यासाठी मनपाने महत्पूर्ण निर्णय घेतला आहे.
यापुढे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची लाईन बसविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.
शहरामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 161 ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनला 60, आयुर्वेद महाविद्यालयात 27 व जैन पितळे बोर्डिंग येथे 74 ऑक्सिजन बेड उभे करण्यात येणार आहेत.
एका बेडसाठी सुमारे 14 हजार रुपये खर्च येणार असून ते काम खासगी संस्थेकडून करून घेतले जाणार आहे. मनपाने स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
दरम्यान जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारावे, यासाठी शहर काँग्रेसने मनपात आंदोलन केले होते. यानंतर मनपाने हा निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
मनपाच्या सावेडी उपनगरातील कचरा डेपोच्या जागेत हा ऑक्सिजन प्लँट उभा राहणार आहे. दरम्यान मनपाचे शहरात ठिकठिकाणी कोविड सेंटर आहेत.
या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने येथे दाखल होणार्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आता ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्यास रुग्णांना दिलासा मिळणार आहे.