Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील सागर शामराव रनमाळे यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी अर्थात सीइए पदावर निवड झाली आहे. बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे भाजी विक्रेते शामराव रनमाळे यांचा तो मुलगा आहे.
सागर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले असून आपल्या आई-वडिलांचे अधिकारी होण्याबद्दलचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने तिसऱ्या प्रयत्नात यश संपादित केले.
त्यांचे माध्यमिक शिक्षण राहाता येथील शारदा विद्या मंदिरमध्ये झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कोपरगाव व त्यांनतर पदवीचे शिक्षण डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट पिंपरी चिंचवड पुणे येथून झाले.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा मुलाखतमध्ये दोन वेळा अपयश आले; पण अपयशाने खचून न जाता प्रचंड मेहनत घेऊन जिद्द व चिकाटीने सागरने यशाला गवसणी घातली आहे.
मी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालो, अधिकारी बनलो, या प्रवासात माझे आई-वडीलच माझ्यासाठी मोठी प्रेरणा होते. त्यांनी काबाडकष्ट करून शिक्षण दिले व माझ्या यशाची प्रेरणा बनले.
आत्मविश्वासाने मी परीक्षेची तयारी चालू ठेवली होती. अखेर परमेश्वराने मला यश दिले. आई-वडिलांच्या व माझ्या प्रामाणिक कष्टाला फळ मिळाले. आई-वडिलांचे कष्ट थांबून त्यांना आता अधिक सुखकर जीवन जगण्याचा आनंद देण्याबद्दलची माझी स्वप्नपूर्ती झाली आहे.
मेहनत, जिद्द, चिकाटी व संयम याचबरोबर गुणवत्ता या बाबी तुमच्या परिस्थितीवर मात करून तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतात. त्यामुळे परिस्थितीच्या आड लपण्यापेक्षा अभ्यास करा, संयम ठेवा, जिद्द सोडू नका, यश तुमच्या सोबत येईल, असा संदेश अभियंता सागर रणमाळे यांनी दिला.