अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या मुद्यावरून माजी मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात एकसंघ वाटणाऱ्या या दिलजमाईत जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत विखे समर्थकांनी राजळे यांच्या विरोधी पवित्रा घेतल्याने ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ आता आमदार मोनिका राजळे समर्थकांवर आली आहे.
मागील लोकसभा निवडणुकी पूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरोधात राजळे असा संघर्ष सुरु होता. मात्र सुजय विखे यांनी भाजपा कडून उमेदवारी मिळवल्याने सुरवातीच्या काळात त्यांना तालुक्यात राजळे समर्थकांनी विरोध केला होता.
कार्यकर्त्यांची मोनिका राजळे यांनी मनधरणी करत त्यांना विखे यांच्या प्रचारात सहभागी करून घेतल्याने या मतदारसंघातून विखे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते.
माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात बोलताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी खूप कष्ट घेतल्यानेच सुजय विखे यांना या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले.
येथून पुढील काळात आम्ही राजळे यांना कायम साथ देउ अशी ग्वाही दिली होती. ही ग्वाही देताना त्यांनी काँग्रेस मध्य असलेले तुमचे मामा जरी तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही तरीही मामा म्हणून मी उभा राहील असा चिमटाही त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना काढला होता.
मात्र सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे यांच्या समर्थकांनी शेवगाव तालुक्यात एक अन पाथर्डी तालुक्यात एक अशी वेगवेगळी भूमिका घेतल्याने सध्या तरी ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ राजळे समर्थकांवर आली आहे.