अहमदनगर बातम्या

Shirdi Breaking : शिर्डीतील ह्या मंदिरात चांदीच्या पादुकांची चोरी ! दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Shirdi Breaking :  शिर्डी येथील बिरोबा बनातील वीरभद्र महाराज मंदिराच्या वॉचमनला चाकुचा धाक दाखवून त्याला अंथरुणातच दाबून ठेवत मंदिरातील ४०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मंदिराचे वॉचमन दिगंबर खंडू घोडे (वय ६५, राहणार बिरेवाडी, बिरोबा बन, शिर्डी) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी शहरातील बिरोबाबन येथील वीरभद्र महाराज मंदिराचे वॉचमन दिगंबर घोडे हे सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सभा मंडपात झोपलेले होते.

या दरम्यान मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे तेथे आले. एकाने घोडे यांना हत्याराचा धाक दाखविला व अंथरुणातच दाबून ठेवले. इतर दोघांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

त्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. मात्र चांदीच्या ४०० ग्रॅम वजनाच्या २० हजार रुपये किंमतीच्या पादुका चोरून चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती समजताच शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट व सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली.

त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा लवकरच तपास लागेल, असा विश्वास पोलिसांना आहे. नागरी वस्ती व अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या या मंदिरात चोरी झाल्याने परिसरात मोठी भीती पसरली आहे. जागृत देवस्थान असल्याने चोरांचा तपास लागून लवकर चोरी उघड होईल, अशी भावना भक्त व्यक्त करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts