अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात लाचखोर अधिकारी-कर्मचारी जास्तच ! पोलीस एक तर महसूल दुसऱ्या क्रमांकावर, पहा आकडेवारी

1 year ago

Ahmednagar News : लाचघेणे व लाच देणे या दोन्ही गोष्टी कायद्याने चुकीच्याच. अहमदनगर जिल्ह्यात देखील लाचखोर अधिकारी कर्मचारी कमी नाहीत. नुकताच एमटीडिसीमधील एक कोटी लाच प्रकरणाचा मुद्दा राज्यभर गाजला.

दरम्यान पोलीस विभागात लाचेचे प्रमाण जास्त दिसते. इतर भागात लाचखोरी आहे परंतु यात पोलीस विभाग अव्वल आहे.

या खालोखाल महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता लाचखोरी थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील अकरा महिन्यांचा विचार केला तर दहा पोलिसांना लाच स्वीकारताना पकडले आहे.

वर्षभरात ३३ कारवाया

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त तक्रारींवरून लाचखोरांविषयी कारवाया केल्या जातात. या विभागाने वर्षभरात ३३ कारवाया केल्या आहेत. यात त्यांनी ४४ लाचखोरांना जेरबंद केले आहे. यात पोलीस विभागातील दहा तर महसूल विभागातील सात कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना पकडलं आहे.

लाचप्रकरणी अटक केलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येते. वर्षभरात जिल्हा परिषदेतील तीन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक केली आहे यात बांधकाम विभागातील, आरोग्य, ग्रामविकास, सहकार, विद्युत, नगरपरिषद, भूमिअभिलेख, पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारीही जेरबंद केले आहेत.

 पुन्हा सेवेत घेतले लाचखोर कर्मचारी पुन्हा अडकलेत जाळ्यात

शासकीय कामकाजासाठी लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेतले जाते. परंतु यातील काही बहाद्दर पुन्हा एकदा या लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

वर्षभरात किती झाल्या आहेत कारवाया ?

पोलिस- १०, महसूल- ७, ग्रामविकास-२, शेती महामंडळ-१, सहकार- २. विद्युत-२, जिल्हा परिषद-२, नगरपरिषद-१, भूमी अभिलेख – १, पाटबंधारे- १, आरोग्य- १, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – २ अशा पद्धतीने कारवाया या वर्षात झालेल्या आहेत.

Recent Posts