अहमदनगर बातम्या

एकमेकांचे विरोधक असलेले ‘हे’ तीन नेते एकाच व्यासपीठावर; मात्र तिघांनीही एकमेकांबाबत केले असे काही

Ahmednagar Politics : आ. प्रा. राम शिंदे, आ. रोहित पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात हे तीनही एकमेकांचे राजकीय विरोधक. तसे हे तिघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची सोडत नाहीत.

त्यामुळे हे तिघे एकाच व्यासपीठावर येणे तसे दुर्मिळच मात्र हा दुर्मिळ योग जुळून आला तो म्हणजे सिताराम गडावर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात हे तिघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

त्यामुळे आता हे एकमेकांवर फैरी झडणार असल्याची अपेक्षा उपस्थित नागरिकांना होती. मात्र घडले वेगळेच यापैकी कोणीच एकमेकांवर टीकाटिपणी केली नाही.

कर्जत जामखेड मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येत आहे. विधानसभेत उमेदवार म्हणून चर्चेत असलेले आ. प्रा. राम शिंदे, आ. रोहित पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात हे तीनही एकमेकांचे स्पर्धक एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सिताराम गडावर सिध्दसंत श्री सिताराम बाबा उंडेगावकर यांच्या दशम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री चतुर्भुज विष्णू व श्री सद्गुरु सिताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सुवर्णकलश वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात या तीन दिग्गजांची एकत्र उपस्थिती होती.

यावेळी कोण काय राजकीय भाष्य करतय हे ऐकायला मिळेल अशी अपेक्षा उपस्थित जनसमुदाच्या मनात होती. मात्र तिघांनीही राजकीय भाष्य करणे टाळले. यावेळी आ. राम शिंदे म्हणाले की, सितारामगड हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे. मी मंत्री असताना गडासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या ठिकाणी आलेला माणूस काहीतरी दिल्याशिवाय जात नाही या गडाचे पवित्र राखण्याचे काम भक्तगणांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की खर्डा या गावचा इतिहास जुना आहे. की गितेबाबा मठ व सितारामगड हे प्रेरणास्रोत असून यांचे नाव दमादमाने एके दिवशी देशाच्या नकाशावर जाईल.

यावेळी काल्याची दहीहंडी महालिंग महाराज नगरे, आ. रोहित पवार व आ.राम शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी आ रोहित पवार म्हणाले की, सिताराम गड धार्मिक शक्तीपीठ असून या ठिकाणी आल्यानंतर काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. सिताराम गडासाठी ३ कोटीचा तर गीतेबाबा देवस्थानाला ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पुढील काळातही सिताराम गडाला भरीव निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी आ. रोहित पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे नाव घेतांना प्रा.राळेभात यांचा नामोल्लेख टाळला. नूकतेच काही दिवसांपूर्वी राळेभात यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व आ. रोहित पवार यांची साथ सोडल्याचे जाहीर केले आहे.

आ. रोहित पवार यांच्यावर एकाधिकारशाही, हुकूमशाही, मीपणा आहे असे आरोप मधुकर राळेभात यांनी केले होते. याची मतदारसंघात मोठी चर्चा झाली. मधुकर राळेभात यांचा जामखेड कर्जत मतदारसंघात सध्या स्वाभिमानी संवाद यात्रा चालू आहे. म्हणूनच कार्यक्रमात आ. रोहित पवार यांनी प्रा. मधुकर राळेभात यांचा नामोल्लेख टाळला आहे अशी नागरिकांमधून चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts