अहमदनगर बातम्या

नाष्टा सेंटरमध्ये घुसून व्यावसायिकाची सोन्याची चेन अन् रोकड पळविली

Ahmednagar News : बोल्हेगाव येथे शितपेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका चोरट्याने दुकानदार महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची घटना ताजी असताना नगर पुणे महामार्गावरील चास शिवारात पुन्हा अशीच घटना घडली आहे.

नाष्टा सेंटर चालवणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानात जावून दोघांनी दमदाटी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि गल्ल्यातील रोकड असा ७० हजारांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे.

चास शिवारातील कार्ले फार्म हाऊस जवळ असलेल्या भैरव नाष्टा सेंटरमध्ये मंगळवारी (दि.२) सकाळी ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत हनुमंत मल्हारराव पवार (वय ५८, रा. भिस्तबाग नाका, पंचवटी नगर, सावेडी) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पवार यांचे चास शिवारात भैरव नाष्टा सेंटर आहे. ते मंगळवारी सकाळी त्यांच्या दुकानात गेले होते. तेथे ९.१५ च्या सुमारास दोन अनोळखी इसम नाष्टा करण्याच्या बहाण्याने आले. त्यावेळी पवार हे त्यांना नाष्टा देण्याच्या तयारीत असताना त्या दोघांनी अचानक त्यांच्या दुकानाच्या गल्ल्याकडे धाव घेत गल्ल्यातील रोख रक्कम काढून घेतली.

फिर्यादी पवार हे त्यांना प्रतिकार करायला लागले असता त्यातील एकाने पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून तोडली व ती घेवून दोघांनी तेथून पोबारा केला. पवार यांनी आरडाओरडा केला मात्र नागरिक जमा होईपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते.

याबाबत पवार यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह परिसरात रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या चोऱ्या घरफोड्या होत आहेत. त्यात भरीसभर म्हणजे बोल्हेगाव येथे सोमवारी (दि.१) आणि चास येथे मंगळवारी (दि.२) भरदिवसा झालेल्या

या धाडसी चोऱ्यांमुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांचे धाडस वाढू लागल्याने त्यांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोऱ्या, घरफोड्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts