अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- गेल्या महिनाभरात श्रीरामपूर शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत.(Ahmednagar Crime)
पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या भागांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या भागातील कॉलन्यांमध्ये बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे पेट्रोल चोरून नेण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्ही सध्या तपास करा, शोधा, मग आमच्याकडे या, अशी उत्तरे दिली जातात. तसेच शहरातील मिल्लतनगरमध्ये असलम बिनसाद तसेच गुलाबभाई शेख यांच्या घरासमोरील गाड्यांमधून पेट्रोल चोरीला गेले आहे.
फातेमा कॉलनी, मिल्लतनगर, संजयनगर परिसरातील अनेक घरांसमोरून गाड्यांतून पेट्रोल चोरून नेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
सर्वसामान्य माणसे आपली वाहने घराबाहेर लावतात. परंतु चोरटे त्यावर डल्ला मारतात. वरून पोलीस तपास होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शहराच्या सर्वच भागात पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी. चोरट्यांशी संबंध असलेल्या पोलिसांच्या तातडीने बदल्या कराव्यात. अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.