अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News : राज्यातील वीज टंचाई कृत्रिम असून खासगी क्षेत्रातून वीज खरेदी करण्यासाठी टक्केवारीचे गणित डोळ्यासमोर ठेवून ती निर्माण केली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
विखे पाटील म्हणाले, ‘समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीज टंचाईतून पुन्हा एकदा समोर आला आहे.
भारनियमनामुळे हैराण झालेल्या शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसा टंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे.
राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत आहे. ढिसाळ कारभार व मागणीच्या वेळेत पुरेशी वीजनिर्मिती करण्यातील नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातील वीजटंचाईला कारणीभूत आहेत.
खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील टक्केवारी कमाईसाठीच हा कृत्रिम वीज टंचाईचा घाट घातला जात आहे.
केंद्र सरकारने वीज खरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू आहे. दलालीतील टक्केवारी घटल्यामुळे अधिकाधिक वीज खाजगी स्रोतांकडून खरेदी करण्यासाठी वीज टंचाई भासवून सामान्य जनता, उद्योगक्षेत्र आणि शेतकऱ्यास वेठीला धरले जात आहे.
कोळशाअभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी,’ अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.