Ahmednagar News : उत्तराखंडातील देवभूमीप्रमाणेच संतांची भूमी म्हणून अहिल्यानगरच्या भूमीची ओळख व्हावी, असा आपला प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन कामही सुरू झाले आहे.
जिल्ह्याचा अध्यात्मिक कॉरीडॉर तयार करुन रोजगाराची इको सिस्टीम तयार करण्याचे उद्दिष्ठ असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील समर्थ प्रतिष्ठानने गणेश उत्सवानिमित्त सादर केलेल्या केदारनाथधाम मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच नगर परिषदेतर्फे सुरु करण्यात आलेल्या कर मूल्यांकनास स्थगिती मिळवून दिल्याबद्दल नागरीकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनाही मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात ते बोलत होते. समर्थ प्रतिष्ठाणचे निलेश कोते यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील देवाच्या भूमीचा जसा कॉरीडॉर तयार केला यातून या भागातील पर्यटनाला नव्या संधी मिळाल्या, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच अहिल्यानगरची भूमी संतांची भूमी म्हणून अधिक ठळकपणे ओळखली जावी, यासाठी आपण काम सुरु केले आहे.
याची सुरुवात नेवासा येथून केली आहे. ज्ञानेश्वर सृष्टीच्या उभारणीसाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अध्यात्मिक स्थान आणि संताचे अधिष्ठाण आहे.
याचे महत्व लक्षात घेऊन ही सर्व तिर्थस्थाने विकास प्रक्रीयेशी जोडण्याचा आपला प्रयत्न आहे. अहिल्यानगर जिल्हा अध्यात्मिक कॉरीडॉर म्हणून भविष्यात ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे उभारले जाणारे राष्ट्रीय स्मारक हे महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारे ठरेल. या माध्यमातूनही जिल्ह्याचे पर्यटन आणि रोजगार निर्माणाची इको सिस्टीम तयार करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.