अहमदनगर बातम्या

आंबा फळबाग लागवडीसाठी जिल्ह्यात प्रथमच केला ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर

Ahmednagar News : आजवर आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत आलो आहोत. मात्र आता शेतीत देखील अनेक तंत्रज्ञान आले असून या तंत्रज्ञाच्या मदतीने आधुनिक पद्धतीने शेती करता येते.

नुकतेच जामखेड तालुक्यात आंबा फळबाग पिकाची लागवड करताना ‘सीआरए’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जिल्ह्यात आजवर अशा पद्धतीने फळबाग पिकाची लागवड करण्यात आली नव्हती.

आंबा व इतर फळबाग लागवडीसाठी ‘सिआरए’ हे तंत्रज्ञान प्रमुखाने तमिळनाडू राज्यात वापरण्यात येत होते. मात्र जामखेड कृषी विभागाने पहिल्यांदाच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

तर मग जाणून घेवूया या तंत्रज्ञानाबद्दल माहिती : वृक्ष किंवा फळबागांची रोपे- कलमे लावण्याच्या जागी दोन बाय दोन फूट बाय दोन फूट खोलीचा खड्डा खोदला जातो. खड्ड्याच्या दोन किंवा चार कोपऱ्यांत दोन फूट लांबीचे पीव्हीसी पाइप रोवले जातात.

यानंतर गांडूळखत, शेणखत व मातीने खड्डा तीन चतुर्थांश भरून घेतला जातो. यावेळी पाइप सरळ रेषेत राहतील याची काळजी घेतली जाते. खड्ड्यात रोप लावून माती भरून घेतली जाते. यानंतर सर्व पाइपमध्ये अर्धा फूट गांडूळ खत (शेणखत) व जमीन पातळीपर्यंत वाळू भरण्यात येते. त्यानंतर पाइप हळूवार वर ओढून बाहेर काढले जातात. ते पुढील लागवडीसाठीही उपयोगी ठरतात.

हळूवार पाइप काढल्याने दोन किंवा चारही कोपऱ्यांत वाळूचा दोन फूट खोलीचा सलग ‘कॉलम’ तयार होतो. रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते. कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तात्काळ ओलावा मिळतो.

गांडूळ खत किंवा शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते. त्यातून मुळांना अन्नद्रव्ये मिळतात. रोपांची वाढ झपाट्याने होते. सशक्त झाड निर्माण होते. काही ठिकाणी ओबडधोबड वाळूचा उपयोग केला तरी चालतो.

बाल्यावस्थेतच काळजी घेतली तर वाढ चांगली होऊन अवर्षणाला तोंड देण्याची रोपांची क्षमता वाढते ठिबकला ‘सीआरए’ ज्या ठिकाणी ठिबक बसवले आहे तेथे ड्रीपर हे वाळूच्या ‘कॉलम’वर येईल याची दक्षता घेतली जाते. ठिबक सुरू केले की पाणी वाळूच्या ‘कॉलम’द्वारे झिरपून दोन फुटांचा मातीचा थर अल्पावधीत सिंचित होतो. या तंत्रामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts