अहमदनगर : पहिल्या फळीतील अनेक नेते पक्ष सोडून गेल्याने मागच्या फळीत बसलेल्यांना यंदा पुढे येण्याची संधी मिळाली आहे.आपले काम इतरांपेक्षा सोपे आहे. आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही. सत्ताधाऱ्यांच्या चुका काय आहेत?
देशातील महागाई, बेकारी व ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्यावर लक्ष केंद्रित करून त्या लोकांसमोर आणा, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला सुरुवात झाली. या शिबीरातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, देशात वाढलेल्या बेरोजगारी, महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी इतक्या चुका केल्या आहे की,आमची आगामी निवडणुकांची लढाई त्यामुळे सोपी झाली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, त्यांना पाडण्याचा विडा आता काही जणांनी उचलला आहे.
कोल्हे यांच्यावर शिवाजी महाराज व आईभवानीचा आशिर्वाद असून सगळा पक्ष त्यांच्या मागे ताकदीने उभा आहे. तेव्हा त्यांनी घाबरण्याचे कारण नाही,असेही पाटील म्हणाले.यावेळी माध्यमांशी बोलतांना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रपती मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनासही बोलावले नाही.
एक महिला आणि त्याही आदीवासी यांना नको आहे का? त्यांना केवळ राष्ट्रपती भवनात बंदिस्त करून ठेवण्यासाठी राष्ट्रपती केलयं का?, श्रीराम आदींवासीचाही देव आहे. राममंदिरासाठी देशभरातून पैसा जमा केला. हे मंदिर म्हणजे कुणा न्यासाची खाजगी मालमत्ता नाही. त्यामुळे कोणाला निमंत्रण द्यायचे व कुणाला नाही हे ते कोण ठरवणार?