महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली, तेच आता कामाचे उद्घाटने करण्यासाठी झोपेतून जागे झाले आहेत. महायुती सरकारने मागील काळातील कामांना स्थगिती दिल्याने विकासकामांत खंड पडला. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली, तेथून न्याय मिळाल्याने आम्ही मंजूर करून आणलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी फोडून राजकारणाला विकृत वळण लावल्याची घणाघाती टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
सोनगाव, धानोरे, तुळापूर या गावातील सुमारे ३ कोटी ३ लाख रुपये खर्चाच्या विविध रस्ते, शाळा खोल्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मण अंत्रे होते. यावेळी जयराम दिघे, सुजित वाबळे, चंद्रभान अंत्रे, योगेश चोरमुले, सागर डुक्रे, सीताराम दिघे, गणेश हारदे, पोपट दिघे, सूर्यभान शिंदे, शिवाजी अनाप, दत्तात्रय पडघलमल, संजय कडू आदी उपस्थित होते.
आ. तनपुरे म्हणाले, की राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सुमारे ३० कोटी रुपये खर्चाची विकासकामांना मंजुरी मिळालेली होती, परंतु पक्ष फोडून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने त्यास स्थगिती दिली. या निर्णयाविरोधात न्यायलायात धाव घेऊन न्याय मिळविला. त्यानंतर सध्याचे शासन जागे झाले.
ज्या लोकांनी स्थगिती आणली, ते आता श्रेय घेण्यासाठी धडपड करीत आहेत. ज्यांनी निधी अडवला, त्यांना आता महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर निधी मागण्याची वेळी येईल. कोट्यवधी रुपयाचे अनुदान थकलेले असताना, आता नव्याने योजना जाहीर झाल्या आहेत.
आमच्या काळात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची योजना अंमलात आणली, परंतु सध्याच्या सरकारच्या काळात संथ गतीने कारभार असल्याने योजना रखडली. कोणत्याही अटी शर्ती न लावता कर्जमाफी केली. कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेल्या कामाचे कौतुक संपूर्ण जगाने केले होते.
आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने गेली साडेचार वर्षे घरात झोपून राहिलेले जनता दरबार घेत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे ४६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यात दिवसा वीज देण्यासाठी आणखी ३-४ हजार कोटी रुपये खर्च आला, तर काय बिघडले? सध्या ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचे काम केले जात असून, अशा ठिकाणी मी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
राष्ट्रवादीचे ४० आमदार दुसरीकडे गेले, आम्ही १२ आमदारच शरदचंद्र पवार गटाकडे राहिलो. माझ्यावरही दबाव आणला होता. आमच्याकडे या, तुमची सर्व कामे मंजूर करतो, असे आमिष दाखवले, पण आम्ही निष्ठावंतच राहणे पसंत केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या काळातील कामांना स्थगिती दिल्याने आम्ही न्यायालयात जाऊन प्रश्न मार्गी लावला, त्यातही काही जण आडवे आले. सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्राम विकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली व न्यायालयाचा अवमान होईल असे निदर्शनास आणून दिल्यानंतर कामांना पुनश्च मंजुरी दिल्याची माहिती आमदार तनपुरे यांनी दिली.