अहमदनगर : सावेडीमधील बँक ऑफ बडोदामधून भाजीविक्रेत्याचे 15 हजार रुपये लांबवले. ही घटना काल 22 डिसेंबरला घडली. किसन नारायण शिंदे (वय 54 वर्ष, रा.भाळवणी) यांनी याबाबत फिर्याद दिली. भर बँकेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
किसन शिंदे यांचे सावेडी येथील बँक ऑफ बडोदामध्ये खाते आहे. 22 डिसेंबर रोजी सकाळी पावणेबारा वाजता दिलीप पाटील यांनी दिलेला 50 हजार रुपये किंमतीचा चेक वटवण्यासाठी ते गेले होते. त्यांनी बँकेतून 50 हजार रुपये रोख रक्कम घेतली.
बँकेत बाकड्यावर बसून ते पैसे मोजत होते. त्याचवेळी एक जण त्यांच्याजवळ आला व त्यांना म्हणाला की, तुमच्याकडील नोटावर डाग आहे ते चालणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेऊन हातातील बंडल त्याच्याकडे दिला. त्याने त्यातील एक 500 रुपयांची डाग असलेली नोट काढून दिली व ही नोट परत बदलून घ्या असे सांगितले.
त्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर मी माझ्या मांडीवरील ठेवलेली अर्धी रक्कम व त्याने दिलेली रक्कम मोजली. यावेळी ते 35 हजार रुपये भरले. त्या अनोळखी इसमाने 15,000 रुपये हातचालाकी करुन काढून घेतले त्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर किसन शिंदे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.