Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगावने परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील पाणीसाठे संपुष्टात येत आहेत. अशा स्थितीत घाम गाळून घेतलेल्या भाजीपाल्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही.
त्यामुळे भाजीपाल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील काळात लावलेला भाजीपाला मोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेवगाव तालुक्यातील देवटाकळी व परिसरातील पाझर तलाव व साठवण तलावातील पाणीसाठा खाली गेला आहे. नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. शेत शिवारातील विहीर व विंधन विहिरींचे पाणी आटले आहे.
जोहरापुर, खामगाव, हिंगणगाव, देवटाकळी, बक्तरपुर, मजलेशहर, भायगावसह परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते.
शेतकरी टोमॅटो, कोथिंबीर, वांगी, भेंडी, मिरची बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. सध्या पाणीसाठा अत्यल्प झाला असून, शेतशिवारातील भाजीपाला जगवणे उत्पादक शेतकऱ्यांना जिकिरीचे झाले आहे. सध्या टोमॅटोला बाजारात दहा रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे.
भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. भाजीपाला लागवडीपासून आतापर्यंत झालेला खर्चही आजपर्यंतच्या उत्पन्नात निघाला नाही. पुढील काळात तर लागणारा खर्च कमी व्हावा, या हेतूने शेतकरी आपल्या शेती शिवारातून भाजीपाला काढून टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. विहीर, कुंपनलिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या देखरेखीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
टोमॅटोला बाजारपेठेत सध्या भाव मिळत नाही. त्यातच पाण्याची अडचण आहे. मी यावर्षी टेम्पोचे पीक घेतले. टोमॅटो पिकाचा लावणीचा खर्चसुद्धा निघाला नाही. दोन तोडणी केली, पुढील तीन तोडण्या न घेण्याचे ठरवले आहे. पाण्याअभावी टोमॅटोचे पीक जळून चालले आहे.