राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था व अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा. याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यास मदत होईल. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील कामांचा आढावा घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव सर्वश्री अभय पाठक, संजीव टाटू, अभियंता प्रसाद नार्वेकर यांच्यासह गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या सिंचनाच्या कामांना गती देऊन प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कृती आरखडा तयार करावा. बांधकामाधीन प्रकल्पाची कामे जलदगतीने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. सिंचन प्रकल्पांच्या नवीन कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता लवकर मिळाव्यात. त्यासाठीचे प्रस्ताव क्षेत्रीय स्तरावरून तातडीने पाठवावेत. सिंचन प्रकल्पाची कामे लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ट कामे विहित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना देऊन जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, १०० दिवसाच्या कालावधीत घेण्यात येणाऱ्या कामांचे सुयोग्य नियोजन करावे. जलसंपदा विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी मुदतीत मिळण्यासाठी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेतली जाईल.
वॉटर अकांऊट बाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. धरणातील पाणी, धरणातून सोडलेले पाणी, सोडलेल्या पाण्याचा झालेला वापर, आकरलेली व वसूल झालेली पाणीपट्टी याबाबत जलसंपदा विभागाने सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
या बैठकीत गोदावरी खोरे महामंडळांतर्गत येणाऱ्या १०० दिवसांमध्ये ज्या प्रकल्पांचे भमिपूजन अथवा उद्घाटन करणे शक्य असेल अशा प्रकल्पांचा आढावा, प्रकल्पांमध्ये असणारा पाणीसाठा व सिंचनाची सद्यःस्थिती, नदीजोड प्रकल्पाची सद्यःस्थिती, सुरु असणारे प्रकल्प अथवा प्रकल्प घटकांच्या कामांची सद्य:स्थिती, मंजूर प्रकल्पांची सद्यःस्थिती, उपसा जलसिंचन योजना व महत्वाच्या प्रकल्पांची सद्यःस्थिती.
यामध्ये प्रामुख्याने साईगंगा उपसा जलसिंचन योजनेचे हस्तांतरण व अंमलबजावणी, साकूर, ता. संगमनेर येथील प्रस्तावित उपसा जलसिंचन योजना, वांबोरी पाईप चारी टप्पा-१ दुरुस्ती / टप्पा-२, भोजापूर ता. संगमनेर येथील जलसिंचन योजना, सहकारी तत्वावर असलेल्या उपसा जलसिंचन योजनांचे तापी जलसिंचन योजनेच्या धर्तीवर नुतनीकरण करणेबाबतचे सादरीकरण, जायकवाडी प्रकल्पाची सद्यःस्थिती (पर्यटन विकास, न्यायालयीन बाबी /अहवाल), करावयाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.