Ahmednagar News : सत्ता ही विकासासाठी असते, हे राज्य व केंद्रातील सरकारने दाखवून दिले आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील गेल्या ३० वर्षांचा विकासकामाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या एक वर्षांच्या कालावधीत प्रामाणीकपणे केला आहे.
आगामी वर्षभरात मतदारसंघाचे रस्ते व विजेचा प्रश्न मार्गी लावू, आज कोण कोणत्या पक्षात आहे, हे कळेनासे झाले आहे, त्यामुळे विचार वेगळे असले तरी विकासासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून खा. विखे पाटील व आ. मोनिका राजळे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या तालुक्यातील ६ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज रविवार, ता. १० सप्टेंबर रोजी खा. डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
खा. विखे म्हणाले की, राज्यातील सरकार गतिमान असून, आ. राजळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्न मुळे विविध प्रश्न मार्गी लागत आहेत. शेवगाव तालुक्यासाठी ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र अवघ्या १० दिवसांत आणून बसवण्याचे काम सुरू असून, येत्या तीन दिवसात ते कार्यान्वित होऊन विजेचा प्रश्न मिटेल.
जिल्हा नियोजन समितीतून वीज रोहित्रांसाठीचा निधी वाढवून १५ ते २० कोटी करण्यात येईल. तालुक्यातील ५३ हजार हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आला असून, कार्यकर्ते प्रत्येक गावात थांबून पीकपाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
शेवगाव ते पांढरीपूल, या चौपदरी रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल. ताजनपूर लिफ्टचे पाणी वर्षभरात शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी पाठपुरावा करू. प्रास्ताविक कचरू चोथे यांनी केले.सूत्रसंचालन शशिकांत खरात यांनी केले. अर्जुन सरपते यांनी आभार मानले.
या वेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हिंगणगाव ते देवटाकळी रस्ता डांबरीकरण करणे, वाघोली ते माका रस्ता डांबरीकरण, वडुले बुद्रुक ते पानसंबळवस्ती रस्ता डांबरीकरण, बालमटाकळी ते मुरमी रस्ता डांबरीकरण, दिंडेवाडी फाटा ते ज्योतीबा चौफुली रस्ता डांबरीकरण, बालमटाकळी ते कांबी रस्ता डांबरीकरण,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बालमटाकळी येथे मॉडेल स्कूल बांधणे, प्रादेि शक पर्यटन विकास योजनेंतर्गत आव्हाणे बुद्रुक येथील स्वयंभू निद्रीस्त गणपती देवस्थान सभामंडप, या कामांचे भूमिपूजन खा. विखे व आ. राजळे यांच्या हस्ते झाले.