Ahmednagar News:अहमदनगर शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने स्टेशन रोडवरील सक्कर चौकातून वाहतूक वळविण्यात आली होती.
आता हे काम पूर्ण झाल्याने ती पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा याला जास्त काळ लागला.
त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर वाहतूक पूर्ववत झाल्याने दिलासा मिळणार आहे.
सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शहरातील इम्पिरियल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला होता. १७ जूनपासून ३० जूनपर्यंत ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा आदेश देण्यात आला होता.
या काळात सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरील बायपासमार्गे वळवण्यात आली तर अन्य वाहतूक कोठी रोड आणि टिळक रोडमार्गे वळविण्यात आली होती.
प्रत्यक्षात हे काम जास्त काळ चालले. त्यामुळे वाहतूकही तेवढा काळ वळवावी लागली होती. या चौकातून पुढे जाणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत होती.
मात्र, उड्डाणपुलाचे काम होत असल्याने नागरिकांनी ही गैरसोय सहन केली. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून काम झाल्याने तेथून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.