अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- शिर्डी ते दौंड एसटी बसमधून प्रवास करताना राहुरी येथून बसलेल्या महिलेचे दोन लाख 13 हजारांचे सोन्याचे दागिणे तीन महिलांनी लंपास केले.
सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दिप्ती भास्कर लांडे (वय 21 रा. पद्मानगर, पाईपलाईनरोड, सावेडी, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन महिलांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिप्ती लांडे या सोमवारी दुपारी अहमदनगरकडे येण्यासाठी शिर्डी-दौंड या एसटी बसमध्ये राहुरी येथून बसल्या होत्या. बसमध्ये त्यांच्या शेजारी अनोळखी तीन महिला बसल्या होत्या.
त्यांनी दिप्ती लांडे यांचे लक्ष विचलित करून दिप्ती यांच्याकडील स्टिलच्या डब्ब्यात ठेवलेले सोन्याचे गंठण, शाहीहार, झुंबे, ठुशी असे दोन लाख 13 हजार रूपये किंमतीचे दागिणे या तीन महिलांनी चोरून नेली असल्याचे दिप्ती लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान आपल्याकडील दागिणे चोरीला गेल्याचे दिप्ती लांडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तशी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.