इंडियन ट्रेडमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची अडीच लाखांची फसवणूक ; नगरमधील घटना

Ahmednagar News : नगर शहरात तसेच ग्रामीण भागात शेअर मार्केटिंग करणाऱ्यांची संख्या कमी नाही. यात मागील काही दिवसांपासून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात शेवगाव तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र सध्या ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी येथील परिस्थीती झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील तिघा मित्रांची तब्बल दोन कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. मात्र अद्याप देखील अनेकजण या अमिषाला आली पडत आहेत.

नुकतेच नगर मधील एकाची इंडियन ट्रेडमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने २ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात त्या अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लक्ष्मण विश्वनाथ भोंगळ (रा. हुंडेकरी शोरूम जवळ, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी भोंगळ यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये ७६९२८७६३९९. ८४३५८४९३८१ या मोबाईल नंबरवरून एका अनोळखी इसमाने संपर्क केला.

त्यानंतर तो वारंवार त्यांच्याशी संपर्क करत त्यांना इंडियन ट्रेड मध्ये अधिक नफा मिळवून देतो असे सांगत होता. फिर्यादीचा विबास बसावा म्हणून एकदा त्याने फक्त एक ट्रेड घेवून पहा असे सांगितले.

फिर्यादीने त्याच्या सांगण्यानुसार एक ट्रेड विकत घेतला, त्या व्यक्तीने फिर्यादीला त्या ट्रेड मध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला, त्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीने त्याला ऑक्टोबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत २ लाख ५९ हजारांची रक्कम ऑनलाइन पाठविली. त्यानंतर मात्र सदर व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क बंद केला. त्यास पैशांची मागणी केली तर तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला.

आपली त्या व्यक्तीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी याबाबत राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार केली. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर त्यांना याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार भोंगळ यांनी गुरुवारी (दि.१८) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts