अहमदनगर बातम्या

आमदार रोहित पवार यांच्या ‘त्या’ मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतली दखल ; नागरिकांना होणार टोलमाफी

Ahmednagar News : अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण व मांदळी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याच्या कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे.

याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करुन पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालया’च्या तांत्रिक सल्लागारांनी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांविषयीच्या विविध मागण्यांबाबत आमदार रोहित पवार यांनी गेल्या महिन्यात नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.

यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अहिल्यानगर-करमाळा महामार्गावर अंडरपास किंवा ओव्हरपास बनवणे, स्थानिक नागरिकांना टोलमाफी देणे, मतदारसंघात ड्राय पोर्टची स्थापना करणे, ग्रीनफिल्ड कॉरीडॉरचं काम तसेच माही जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी केली होती.

याबाबत गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांनी या मागणीची पत्रेही दिली होती. कर्जत तालुक्यातील नागमठाण व मांदळी ही दोन्ही गावे अहिल्यानगर- सोलापूर महामार्गावर आहेत. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात अनेक धार्मिक व अध्यात्मिक स्थळे असल्याने या दोन्ही गावांमध्ये प्रवाशी यात्रेकरूंची नेहमीच गर्दी असते.

याशिवाय विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिक यांना तर दैनंदिन कामासाठी सततच हा महामार्ग ओलांडावा लागतो. यावेळी अपघात होऊन जिवीत हानी होण्याची भीती असते. म्हणून हा मार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा यासाठी नागमठाण आणि मांदळी या दोन्ही गावाच्या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास बनवण्याची आग्रही मागणी रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली होती.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts