भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने आदिवासी बांधवांवर अस्माणी संकट ओढावले असून मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीने सुमारे ४० हेक्टर जमिनीवरील भातपिक भुईसपाट झाले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार गारपिट झाली, गारपिटीचा साम्रद, लव्हाळवाडी, शिंगणवाडी व उडदावणे गावांना तडाखा बसला असून वादळी बाऱ्यासह पाणलोटासह संपूर्ण भंडारदरा परिसर अवकाळी पावसाने झोडपून काढला.
या वादळी वाऱ्यामध्ये बुवाजी गांगड, सखाराम गांगड, गंगाधर गिन्हें, चंदर गांगड, शंकर मधे, मारूती गांगड, बाळु गांगड, बयाजी लोते, ज्ञानेश्वर आगिवले यांच्यासह उडदावणे गावातील अनेक नागरिकांच्या घरांची कौल तसेच पत्रे पावसाने उडविले.
तर अनेक ठिकाणी मोठ-मोठे वृक्षही उन्मळून पडलेले दिसुन आले. महावितरणचे विजेचे उभे पोल कोसळल्यामुळे अनेक गावातील विजही गायब झाली होती.
अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे आदिवासी भागातील भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चाळीस हेक्टरवरील भातपिक भुईसपाट झाले आहे. तर आदिवासी बांधव नुकतेच टोमॅटोची लागवड करु पाहत असताना त्यासाठी तयार केलेले रानही वाहुन गेले. तसेच टोमॅटो रोपाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक आदिवासी शेतकरी बांधवांनी भात सोंगुन शेतात टाकला होता.
मात्र, अचानक आलेल्या पावसाने या शेतकरी बांधवांना सोंगुन ठेवलेला भातही गोळा करता आला नाही. तो जोरदार पावसाच्या पाण्यामध्ये वाहुन गेला. तर जनावरासांठी उपयोगी येणारा भाताचा पेंढाही पावसामुळे भिजला गेला आहे.
कृषी विभागाकडुन सदर नुकसानीची पाहणी केली गेली असून नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. अचानक आलेल्या अवकाळीने आदिवासी बांधवांचा आर्थिक श्रोत हिरावुन घेतला आहे.