Ahmednagar News : तिसगाव परिसरातील पारेवाडी, सोमठाणे, तिसगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वार्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या वादळ व अवकाळी पावसाचा मढी यात्रेतील व्यावसायिकांना देखील अटक बसला. जोरदार आलेल्या वाऱ्यने येथील अनेक व्यावसायिकांचे तंब उडाले, साहित्याचे देखील नुकसान झाले त्यामुळे काही काळ यात्रा विस्कळीत झाली.
भटक्यांची पंढरी असलेल्या मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेचा रंगपंचमी मुख्य दिवस असून, राज्यासह तेलंगाना, गुजरात राज्यातूनही भाविक मढी येथे दाखल झाले आहेत. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तिसगावहून येणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
पाणी टंचाई लक्षात घेता पनवेलच्या कानिफनाथ भक्त मंडळातर्फे दर्शन रांगेतील भाविकांना पाणी बॉटल वाटण्यात आल्या. हलवाई व्यवसायतही सायंकाळ नंतर उलाढाल वाढली. नाथांच्या जयघोषाने मढी परिसर दुमदुमला. अवकाळी पावसाचा फटका यात्रेलाही बसला.
पुणे, पनवेल, कल्याण, संभाजीनगर, नाशिक विभागातून सर्वाधिक भाविक नेहमीप्रमाणे मढीत दाखल झाले असून मंदिर परिसरात शामियाने तंबू उभारून अस्तान्या म्हणजे अस्थायी स्वरूपातील नाथ दरबाराची स्थापना करत पारंपारिक पद्धतीने विधी पूर्ण केले. नाथांना प्रिय असणारी दवणा नावाची सुगंधी वनस्पती यंदा कमी पावसामुळे कमी प्रमाणात उपलब्ध झाली आहे.
विविध गावांच्या भाविकांनी सेवा कार्यात पुढाकार घेतला असून, सर्वत्र ठिकठिकाणी महाप्रसाद भंडाऱ्याचे कार्यक्रम संपन्न झाले. देवाच्या नावावर चालणारी पशुहत्या यंदा पूर्णपणे बंद असून मटण विक्री व्यवसाय करणाऱ्यांनाही यात्रेच्या दिवशी देवाच्या नावावर हत्या होऊ नये म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत, देवस्थान समिती व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
भटक्यांची पंढरी म्हणून मढी यात्रेची ओळख असून अठरापगड जातीचे भाविक दर्शनासाठी येतात. अनेक भाविकांचे कुलदैवत कानिफनाथ असल्याने सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या अधिक असते. संपूर्ण आमराईमध्ये पाल ठोकून भटके राहतात. दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरींमुळे काही काळ भाविकांसह व्यावसायिकांची धावपळ उडाली. पार्किंगच्या मोठा प्रश्न निर्माण झाल्याने खाजगी जागा मालकांनी पेड पार्किंग सुविधा दिली. तेलंगाना विशेषतः हैदराबाद येथील बंजारा भाविकांनी पारंपारिक नृत्य करत वाद्य वाजवत देवाचे दर्शन घेतले.
नगर पाथर्डी, शेवगाव पाथर्डी, बीड पाथर्डी असे सर्वच रस्ते भाविकांच्या वाहनांच्या गर्दीने फुलून महानगराचे रूप पाथर्डीला आले, यात्रेनिमित्त तालुक्यात येणारा भाविक मोहटा, मायंबा, वृद्धेश्वर येथेही भेट देत असल्याने या निमित्ताने सर्वत्र आर्थिक उलाढाल वाढली.
नाशिक येथील भाविकांनी यात्रा प्रक्षेपण सुविधा मोफत केली. तर पुण्याच्या भाविकांनी शोभेच्या वारू कामाचे सेवा कार्य यंदा पूर्ण केले. संपूर्ण गड रोषणाईने चकाकला. मटकी भाजी, भाकरी, तव्यावरचे पिठले असा अस्सल गावरान मेनू पालात बसून खाण्यासही भाविकांची गर्दी झाली. रात्री उशिरा मढी व परिसरात वाहने लावायला सुद्धा जागा नव्हती.
पोलिसांचा बंदोबस्त मोठा असल्याने पहिल्या दिवशी तरी गुन्हेगारी घडली नसून सर्वत्र सीसीटीव्ही व साध्या वेशातील पोलिसांची यात्रेवर नजर आहे. एसटीतर्फे सुमारे दोनशे बसेस जिल्हा सह नाशिक, संभाजीनगर, बीड विभागातून यात्रा सेवेत असून दोन पंचमी तिथी आल्याने अनेक भाविक आज दर्शन करून रविवारी होणाऱ्या नाथ षष्ठी साठी पैठणला गेले.
राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक मुक्कामासाठी मोहटा देवस्थान येथे विविध प्रकारच्या सुविधा चांगल्या दर्जाच्या असल्याने दाखल झाले. त्यामुळे नवरात्र सदृश गर्दी मोहटा देवस्थान परिसरात होती. नाथांच्या अस्तान्या वाजत गाजत मढीत दाखल होत असून रथ व विशिष्ट प्रकारे वाजणारे ताशे व भगवे वख परिधान करत आलेले नाथसेवक यामुळे वातावरण यात्रामुळे झाले आहे.
पारेवाडी, सोमठाणे, तिसगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी भाऊसाहेब आठरे यांचे या वादळामुळे संत्रा फळबागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे अनेक झाडे उनमळूण पडल्याने तिसगाव मढी रस्ता देखील काही वेळ वाहतुकीसाठी बंद झाला होता.