Ahmednagar Breaking : नगर जिल्ह्यातील अर्बन बँक फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी खासदार व नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष स्व: दिलीप गांधी यांच्या कुटुंबास न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. गांधी परिवारातील पाच जणांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामिन अर्ज केले होते. ते अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत . त्यामुळे त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते.
याबाबत अधिक माहिती अशी, नगर अर्बन बँकेचे माजी संचालक व अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी २८ कर्ज प्रकरणांतून बँकेची १५० कोटींची फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रारी दाखल केली होती.
त्यावरून पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी बँकेच्या सर्वच कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट केले. त्यातून ६५ प्रकरणांतून २९१ कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
यात भाजपचे माजी खासदार व बँकेचे माजी स्व. दिलीप गांधी व त्यांच्या परिवारातील सदस्यांचाही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांच्या खात्यात बँकेला विविध वस्तूंचा व साहित्याचा पुरवठा करणार्या ठेकेदारांकडून पैसे जमा झाले आहेत.
त्यामुळे या सर्वांवर पोलिस कारवाईची टांगती तलवार असल्याने ५ जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. मात्र न्यायालयाने त्यावर सुनावणी घेऊन ते सर्व फेटाळले आहेत.
प्रगती देवेंद्र गांधी, देवेंद्र दिलीप गांधी, सरोज दिलीप गांधी, सुवेंद्र दिलीप गांधी आणि दीप्ती सुवेंद्र गांधी या पाच जणांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. आम्ही बँकेत संचालक नव्हतो, तक्रारदार राजेंद्र गांधी यांनी राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध तक्रार केली आहे.
बँकेत आम्ही जबाबदार पदांवर काम करीत नव्हतो, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर सरकार पक्षातर्फे अॅड. मंगेश दिवाणे व ठेवीदारांच्यावतीने अॅड. अच्युतराव पिंगळे यांनी म्हणणे मांडले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत की, पैसे अडकलेल्या संस्थेतील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई गरजेची आहे. बँकेचा बँकींग व्यवसाय परवानाही रद्द झालेला आहे. त्यामुळे कोणालाही अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये, असे म्हणणे अॅड. दिवाणे व अॅड. पिंगळे यांनी मांडले.
न्यायालयाने ते ग्राह्य धरून पाचही जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे आता या पाचही जणांवर पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.