Ahmednagar News:कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरले.
कृष्णावंती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. भंडारदरा धरणामध्ये गत १२ तासात विक्रमी ४०९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने भंडारदरा धरण चार हजारी झाले आहे.
अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखरावर शनिवारी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला पुर आला. कृष्णांवती नदीवर असणाऱ्या ११२.६६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या असणाऱ्या लघु बंधाऱ्याला कालच भरण्याचे वेध लागले होते.
मात्र सकाळपासुन मुसळधार पडत असलेल्या पावसाने कृष्णावंती धोक्याच्या पातळीवरुन वाहती झाल्याने दुपारी एक वाजता वाकी धरण पुर्ण क्षमतेने भरुन वाहु लागले. वाकी धरण भरुन वाहु लागल्यामुळे निळवंडे धरणात आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढणार आहे.
संध्याकाळी सहा वाजता कृष्णांवती नदी ७८९ क्युसेक्सने वाकी धरणावरुन वाहत होती.भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही मुसळधार पाऊस पडत असल्याने आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरल्याने भातरोपे पाण्याखाली गेली आहेत.