अहमदनगर बातम्या

Nilwande Water : निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरावेत अन्यथा ‘जलसमाधी’ घेण्याचा इशारा

Nilwande Water : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटलाचीवाडी येथील शेतकरी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्यावेत, या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

निळवंडे कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून न दिल्यास कौठेकमळेश्वर शिवारातील बोगद्यामध्ये शनिवारी (दि.९) दुपारी दोन वाजता जलसमाधी घेवू, असा इशारा पंढरीनाथ इल्हे, तात्यासाहेब दिघे यांच्यासह ४० संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

बाळपाटलाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून कैफियत मांडली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दिघे येथील बाळपाटलावाडी परिसरात निळवंडे डाव्या कालव्याच्या पहिल्या आवर्तनामध्ये पाटपाणी आले होते.

तेव्हा लाभक्षेत्रातील पाच बंधारे भरले होते. परंतु दुसऱ्या आवर्तनामध्ये कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर येथील ग्रामस्थांनी परस्पर बंधाऱ्याची सांड फोडून कालव्याचे पाणी कोपरगाव तालुक्यात वळविल्याने तळेगाव दिघेच्या बाळपाटलाचीवाडी शिवारातील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत.

निळवंडोच्या दुसन्या आवर्तनामध्ये तळेगाव शिवारातील लाभक्षेत्रातील पाच बंधाऱ्यापैकी दोनच बंधारे भरले आहेत. उर्वरित तीन बंधारे कोरडेच असल्याने सदर क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.

कालव्यातून पाणी वाहून जाताना बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निळवंडेच्या पाण्याने लाभक्षेत्रातील उर्वरित तीन बंधारे भरून द्यावेत, अन्यथा आम्ही बाळपाटलाचीवाडी

येथील शेतकरी कौठेकमळेश्वर शिवारातील बोगद्यामध्ये शनिवारी (दि.९) दुपारी २ वाजता जलसमाधी घेऊ. त्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे विभागाची असेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

सदर निवेदनाच्या प्रति सबंधित अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. निवेदनावर शिवसेना नेते पंढरीनाथ इल्हे, माजी पंचायत समिती सदस्य आशा इल्हे, माजी सरपंच तात्यासाहेब दिघे, मच्छिद्र दिघे, भानुदास दिघे, नारायण दिघे, राधाकिसन दिघे,

रामभाऊ दिघे, शामराव दिघे, अशोक दिघे, दत्तात्रय दिघे, गफूर शेख, दगू शेख, अस्लम शेख, य • योगीराज दिघे, सचिन दिघे, निलेश दिघे, संजय दिघे, सुनील दिघे, अनिल दिघे, चांगदेव दिघे यांच्या सह्या आहेत.’

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्या, अन्यथा कौठेकमळेश्वर शिवारातील बोगद्यात जलसमाधी घेवू, असा इशारा बाळपाटलाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी दिल्याने पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts