Kopargaon News : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची गरज असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात काल गुरुवारी पाणी सोडण्यात आले आहे.
निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबादसह मतदारसंघातील वाकडी, चितळी, धनगरवाडी या जिरायती गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, पाणी सोडल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच यासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कोल्हे यांचे निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आभार मानले.
नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या सात तालुक्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम तब्बल ५३ वर्षांनंतर पूर्ण झाले असून,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबरला त्याचे उद्घाटन व लोकार्पण झाले आहे. निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे एकूण ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे.
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात सन २०१६-१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे निळवंडे धरणाचे व डावा कालव्याचे काम गतीने पूर्ण झाले.
यंदा कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या निळवंडेच्या डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नागरिकांचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरम्यान, काल गुरूवारी कोल्हे यांनी निळवंडेच्या डाव्या कालव्यात जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहाय्यक अभियंता कदम यांच्या उपस्थितीत नारळ फोडून पाणी सोडले आहे.
आजचा दिवस हा निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ११ गावांचा निळवंडेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.
निळवंडेच्या डावा कालव्याद्वारे आज लाभक्षेत्रात पाणी आल्याने स्व. कोल्हे व गेल्या पाच दशकांपासून जिरायती भागातील शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्षे पाहिलेले स्वप्न अखेर आज पूर्ण झाले आहे. – स्नेहलता कोल्हे, माजी आमदार.