अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन स्थलांतरीत करण्याचे काम जीवन प्राधिकरणाने सुरू केले आहे.
यामुळे येत्या आठवडाभर धरणातून होणारा शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. त्यामुळे ऐन दीपावलीच्या तोंडावर आठवडाभर संगमनेरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.येत्या गुरुवारपासून (२१ ऑक्टोबर) एक दिवसाआड शहराला प्रवरा नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडून सुरू आहे. या कामासाठी आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याने निळवंडे धरणातून संगमनेरला पाणीपुरवठा करणारी लाईन बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून शहराला पाणीपुरवठा होणार नाही.
दरम्यानच्या कालावधीत संगमनेरकरांना एक दिवसाआड प्रवरा नदीपात्रातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.संगमनेर शहर व उपनगरात होणारा हा पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होणार आहे. निळवंडे धरणातून संगमनेरकरांसाठी थेट पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे संगमनेरचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला.
आता मात्र ऐन दीपावलीच्या तोंडावर दुरुस्तीच्या नावाखाली हा पाणीपुरवठा आठवडाभरासाठी बंद राहणार असल्याने संगमनेरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहर व उपनगरात दैनंदिन करण्यात येणारा पाणीपुरवठा नियमित केला जाईल.