अहमदनगर बातम्या

Rahuri News : आम्ही ग्रामपंचायतीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन जातो ! कार्यालयात ग्रामसेवकच उपस्थित नसतात…

Rahuri News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कार्यालयात गैरहजर असतात, त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक कार्यालयात आलेल्या लोकांना व सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात,

त्यामुळे गावासाठी पूर्ण वेळ देणाऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करून येथील ग्रामसेवकाची तत्काळ बदली करण्यात यावी अन्यथा दि. १८ ऑक्टोबरपासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सत्ताधारी गटानेच दिल्याने तिसगावच्या ग्रामसेवकाविरोधात पुन्हा एकदा सत्ताधारी गट आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

तिसगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाविरोधात यापूर्वीदेखील सत्ताधारी गटाने पंचायत समितीकडे तक्रार केली होती; परंतु पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे डोळेझाक करून ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.

आता पुन्हा एकदा सोमवारी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या महिला तालुका उपाध्यक्षा शबाना शेख, तिसगावचे उपसरपंच अमोल गारुडकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर, बिस्मिल्ला पठाण, युवानेते प्रदीप ससाने यांनी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांना लेखी निवेदन देऊन या ग्रामसेवकांविरोधात तक्रारींचा पाढा वाचून दाखवला.

आमदार तनपुरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित ग्रामसेवकाची तत्काळ बदली करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. त्यामुळे आता तरी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ग्रामसेवकाची बदली केली जाणार का ? हा महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

तिसगावमध्ये महिना- दीड महिन्याला नळाला पाणीपुरवठा केला जात आहे, पिण्याच्या पाण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यास ग्रामसेवकाला वेळ नाही, त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन जातो, वार्डामधील कामे घेऊन जातो; परंतु कार्यालयात अनेक वेळा ग्रामसेवकच उपस्थित नसतात, प्रश्न मांडायचे कोणाकडे, असा प्रश्न आम्हाला पडतो, असे ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Rahuri News

Recent Posts